शहरातील प्रमुख चौक रिकामे व्हावेत…

0
53

कोल्हापूर (प्रतिनिधी): महापालिका प्रशासनाचा फेरीवाल्यांच्या व्यवसायासाठी विरोध नसून फेरीवाल्यांनी व्यवसाय केले पाहिजेत. परंतु शासनाच्या नियमात राहून. कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्वभवणार नाही, याची दखल फेरीवाल्यांनी घेतली पाहिजे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर महाद्वार चौकासह शहरातील प्रमुख चौक, फुटपाथ रिकामे झाले पाहिजेत. अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे. त्यामुळे शहराला शिस्त लावण्यासह फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असून फेरीवाल्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी केले.

आज (गुरुवार) महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात फेरीवाला कृती समिती, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यावेळी प्रशासक डॉ. बलकवडे बोलत होत्या.

अतिक्रमणामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून त्याचा परिणाम शहराचा विकास आणि पर्यटनावर होत आहे, असे मत वाहतूक निरीक्षक स्नेहा गिरी यांनी व्यक्त केले. शहराला शिस्त लागलीच पाहिजे याबाबत दुमत नाही. परंतु बाहेरून व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

महाद्वार चौकात किरकोळ व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा प्रश्न बाकी असून त्यांना तडजोड करून सहकार्य करावे, असे आवाहन फेरीवाले कृती समितीच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर महापालिका प्रशासन अधिकारी आणि कृती समितीचे पदाधिकाऱ्यांनी अंबाबाई मंदिर महाद्वार परिसरात जात पुन्हा पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी येथील फेरीवाल्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु फेरीवाले चौकातच व्यवसाय करण्यावर ठाम राहिले. तर प्रशासन चौक रिकामाच पाहिजे, या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आजही हा प्रश्न प्रलंबितच राहिला.

अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिक्रमण हटाव पथकाचे पंडित पोवार, कृती समितीचे आर. के. पवार, नंदकुमार वळंजू, रियाज कागदी, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, दिलीप पोवार, किशोर घाटगे उपस्थित होते.