वाडीरत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली कोठारे व्हिजन प्रस्तुत ‘दख्खनचा राजा  जोतिबा’ ही मालिका तिच्या कथानकामुळे वादात सापडली आहे. या मालिकेमधील कथा ही मूळ केदार विजय ग्रंथाला अनुसरून नाही, तसेच यामधील भाषा, वेशभूषा देखील मालिकेला साजेशी दिसून येत नाही, असे पुजारी आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यासाठी श्री क्षेत्र जोतिबा डोंगर, वाडीरत्नागिरी येथील हक्कदार पुजारी वर्ग, विश्वशक्ती मित्र मंडळ, जोतिबा क्रांती युवक संघटना, यांनी या मालिकेतील कथानकामध्ये योग्य तो बदल करावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या, शालिनीताई ठाकरे यांच्या उपस्थितीत कोठारे व्हिजनचे प्रमुख महेश कोठारे, स्टार प्रवाहचे हेड, लेखक प्रा. विठ्ठल ठोंबरे, यांच्या समवेत मालिकेसंदर्भात मुंबई येथील बैठकीत विचार विनिमयाने चर्चा केली. यावेळी श्री क्षेत्र जोतिबा डोंगरचे केदार विजय या ग्रंथाचे अभ्यासक जयवंत शिंगे, नेताजी दादर्णे, यांनी श्री जोतिबा देवाचा इतिहास केदार विजय ग्रंथाला अनुसरून मांडला.

त्याचबरोबर कशाप्रकारे कोठारे व्हिजनने विरोधाभास निर्माण करणारी कथा प्रेक्षकांच्या समोर मांडली, आणि खरी कथा नेमकी कशी आहे याचे विवेचन त्यांनी केले. त्यावेळी कोठारे व्हिजनचे प्रमुख महेश कोठारे यांनी ही कथा ऐकल्यानंतर याप्रमाणे मालिकेमध्ये योग्य तो बदल करू आणि स्थानिक नागरिकांच्या मताला प्राधान्य देऊ, असे आश्वासन दिले.

यावेळी या बैठकीला श्री क्षेत्र जोतिबा डोंगरचे हक्कदार पुजारी जयवंत शिंगे, नेताजी दादर्णे, जगनाथ दादर्णे, आनंदा लादे, सुनिल नवाळे, गोरख बुणे, अजित दादर्णे, विक्रम चौगले, नवनाथ लादे, महेश मिटके, अनिल मिटके, राजाराम चौगले, अमोल झुगर, केदार लादे, चेतन शिंगे, गणेश झुगर, दीपक बुणे, आदी उपस्थित होते.