कागल (प्रतिनिधी) : महाआवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या स्वतःच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले. असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या अभियानांतर्गत गेल्या १०० दिवसात विविध योजनांमधील तब्बल पाच लाख घरकुले पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. ते कागल पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरीय पुरस्कार वितरणावेळी बोलत होते. यावेळी ग्रामपंचायती आणि घरकुलधारकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

ना. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, शबरी आवास योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून सुरु असलेल्या घरकुलांची कामे रखडलेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून महाआवास अभियान सुरू केले आणि अवघ्या शंभर दिवसातच चांगली फलनिष्पत्ती झाल्याचे सांगितले.

जि.प. सदस्य युवराज पाटील म्हणाले की, विविध योजनांच्या माध्यमातून मंजूर होणाऱ्या घरकुल अनुदानाची रक्कम सव्वा लाखांऐवजी अडीच लाख होणे गरजेचे असल्याचे सांगितले. जि.प. सदस्य अमरीश घाटगे यांनी, मागील पाच वर्षात पंचायत राज्यव्यवस्थेला अक्षरश: मरगळ आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ना. हसन मुश्रीफ यांनी पंचायतराज व्यवस्थेला खऱ्या अर्थाने उर्जितावस्था आणल्याचे सांगितले.