नाशिक (प्रतिनिधी) : आगामी काळातील सर्वच निवडणुका महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष एकत्र लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. मी तर म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर तशी इच्छाच आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) येथे म्हटले आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  

फडणवीस म्हणाले की, आगामी काळात भाजपमध्ये अनेक जण प्रवेश करणार आहेत. भाजपला सोडून कुणीही जाणार नाही. काहीजण उगाचच वावड्या उठवत आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.

महाविकास आघाडी एकत्र लढल्याने एखादा तात्कालीक फायदा त्यांना होईल. परंतु, तीन पक्ष एकत्र आल्यामुळे जी राजकीय जागा असते, त्या जागेत किती लोकं मावतील? हे देखील एक महत्वाचे आहे. दोनच पक्ष एकत्रितपणे त्या राजकीय जागेत मावणं कठीण जाते, हे तीन पक्ष एकत्र येतो म्हणतात. याचा अर्थ असा आहे, त्यातली सर्वात मोठी जागा जी आहे ती भाजपासाठी ते मोकळी सोडणार आहेत आणि भाजप ती जागा घेईल. एखाद्या-दुसऱ्या निवडणुकीत इकडंतिकडं झालं तरी चिंता करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.