कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील ४८ पैकी ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. ८ ग्रामपंचायतीत विरोधी पॅनेलचा धुव्वा उडाला. तर ५ ठिकाणी सत्तांतर झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी ५ ग्रामपंचायती बिरोविरोध झाल्या. उर्वरित ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये बहुतांशी ठिकाणी चित्र विचित्र आघाड्या झाल्या होत्या.

हासुर खुर्द, भडगाव, मेताके, साके, गलगले, बोळविवडी, बस्तावडे, हळदी या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने निर्विवाद यश मिळवले.

या निवडणुकीत एकूण ५२७ सदस्य होते. यामध्ये मुश्रीफ गट २३४ मंडलिक गट ९८ संजय घाटगे ८७ राजे गट( भाजप) ७६ आणि इतर ३२ असे सदस्य गटवार निवडून आले आहेत.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार शिवाजी गवळी, मुख्याधिकारी पंडीत पाटील, मुरगूडचे मुख्याधिकरी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी मतमोजणीसाठी काम पाहिले. यावेळी कागल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कासारी (ता.कागल) येथे महाविकास आघाडीची सत्ता आली. ९ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या. चार जागांसाठी मतदान झाले. यामध्ये २ जागांवर महाविकास आघाडीचे तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. याठिकाणी प्रभाग एकमध्ये महाआघाडीचे उमेदवार अनिल तुकाराम नाईक तर अपक्ष उमेदवार शिवाजी हनुमंत पाटील यांना समान २३० मते मिळाली. शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे नववीचा विद्यार्थी उदयभान अजय बेंदकर यांने चिठ्ठी उचलली आणि अपक्ष उमेदवार शिवाजी हनुमान पाटील विजयी झाले.

सुळकुड ग्रामपंचायतीच्या संजय घाटगे गटाच्या विजयमाला आण्‍णासो पोवाडे यांनी विद्यमान सरपंच ज्योती अरुण पोवाडे यांचा एक मताने पराभव केला. तर बिद्री ग्रामपंचायतीच्या शोभाताई राजेंद्र चौगुले यांनी दिपाली पांडुरंग कमळकर यांचाही एक मताने पराभव केला. तमनाकवाडा येथील प्रभाग क्रमांक १ मधील रवींद्र पाटील यांचा पराभव झाला. आलाबाद ग्रामपंचायतीमध्ये पती-पत्नी विजयी झाले.