कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर भाजपच्या वतीने शहरात भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली “महाविकास आघाडी सरकारला जाब विचारूया – जनतेशी संवाद साधूया”  हे अभियान आज (गुरूवार) राबविण्यात आले. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, गुन्हेगारी अशा दुष्कृत्यांचा पाढा वाचण्यासाठी, महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येण्यासाठी हे अभियान राबवत असल्याचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले.

शहराच्या सात मंडले, आघाडी व मोर्चे यांचे संयोजकांनी स्वतंत्रपणे हे अभियान राबवले. आज सकाळी दहा वाजता शहरातील प्रमुख मार्गांवर प्रत्येकाला दिलेल्या ठिकाणी सरकारच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचणारे माहिती पत्रकाचे वितरण करून रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने-घरे या ठिकाणी जाऊन पत्रके देण्यात आली. यावेळी सरकारच्या चुकीच्या बाबी लोकांसमोर नीटपणे कार्यकर्त्यांनी मांडल्या. या अभियानाला जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळाला. अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेमध्ये देखील महाविकास आघाडी सरकार बद्दल भावना तीव्र असल्याचे दिसून आले.

या अभियानात जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, जिल्हा सरचिटणीस गणेश देसाई, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, मंगळवार पेठ मंडल अध्यक्ष संतोष माळी, प्रीतम यादव, सुधीर देसाई, सचिन साळोखे, कृष्णा आतवाडकर, प्रदीप पंडे, डॉ.राजवर्धन, सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी यांनी सहभाग घेतला.