कोल्हापूर (प्रतिनिधी) : तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे. याबद्दल या सरकारचे वर्णन महाअपयशी असेच करावे लागेल, असा आरोप भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, आघाडी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. सामान्य, कष्टकरी, शेतकरी, वीज ग्राहकांना त्यांना दिलासा देता आले नाही. त्यांच्यात एकवाक्यता नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळी वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. आले अंगावर तर ढकला केंद्रावर..! अशी त्यांची कार्यपध्दती आहे. मुख्यमंत्री घराबाहेर न पडताच कारभार करत आहेत. राज्यात वारंवार कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी सरकार जनतेचा विश्वासघात केला आहे. शिवसेनेला ज्यावेळी गरज होती, त्यावेळी भाजपच्या नेत्यांचा फलक लाऊन मते मागितले. आता ते बेताल वक्तव्य करीत आहे. त्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही.

यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, राहूल चिकोडे आदी उपस्थित होते.