कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ उद्या (शनिवार) कोल्हापुरात पदवीधर व शिक्षकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी दोन वाजता कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्ह्यातील आमदार आदी मान्यवरही उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिली.

त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी, विधानसभाध्यक्ष व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, नगरपालिका क्षेत्रातील शहराध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी, नगरपालिका/महानगरपालिका नगरसेवक व पदाधिकारी, बाजारसमिती/केडीसीसी बॅंक/सहकारी साखर कारखाना संचालक व पदाधिकारी, पक्ष संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी  उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

प्रचाराचे नियोजन

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत अरुण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजता इचलकरंजी येथे, रविवारी (ता. २२) दुपारी बारा वाजता आजरा येथे,  सोमवारी (ता. २३) दुपारी बारा वाजता खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत कागल येथे मेळावा, सायंकाळी चार वाजता कोल्हापुरात कोल्हापूर शहर प्रचार नियोजन व मंगळवारी सकाळी ११ वाजता जयसिंगपूर येथे मेळावा याप्रमाणे प्रचार मेळावे होणार आहेत.