कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार व शोषित जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेले ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील गेली अनेक वर्षे शेतकरी व कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी संघर्ष करत होते. त्यांच्या निधनाने लढवय्या बाण्याचा संघर्ष योद्धा महाराष्ट्र राज्याने गमावला, अशा भावना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या. 

क्षीरसागर पुढे म्हणाले की, अशिक्षित, शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केली. यासह शेतकरी, कष्टकरी जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला. विधान परिषद सदस्य, कोल्हापूरचे विधानसभा सदस्य ते राज्याचे सहकार मंत्री या पदावरही काम करताना त्यांनी शेतकरी, कष्टकरी जनतेला न्याय देण्याचे काम केले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही.

कोल्हापूर शहरातील टोल आंदोलनात अग्रभागी असताना त्यांचे नेतृत्वगुण जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. टोल आंदोलनात ‘स्वराज्याच्या शेलार मामा’ प्रमाणे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानेच कोल्हापूरवासियांना ‘टोल’ चा गड जिंकता आला. आंदोलन कसे करावे आणि ते यशस्वी होईपर्यंत मागे न हटणे, न्यायासाठी कठोर संघर्षाची भूमिका अंगिकारणे या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. त्यांच्या निधनाने राज्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या परिघातून शेतकरी, कष्टकरी जनतेचा लढावू नेता हरपला, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.