मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या अष्टपैलू गायकीने असंख्य रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान पटकावलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२० सालासाठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आज (गुरुवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

८७ वर्षांच्या आशा भोसले यांनी मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, भोजपुरी, तमिळ, मल्ल्याळम, इंग्रजीसह चक्क रशियन भाषेत गाणी गायिली आहेत. आपल्या सुमारे सात दशकांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली आहेत. मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिला जाईल. अखेर  ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.

या बैठकीमध्ये समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंनी अभिनंदन केले.