मुंबई (प्रतिनिधी) : पंढरपूर येथे यंदा आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी झाली नव्हती.

इंग्रजांच्या काळात विठ्ठलाच्या महापूजेची परंपरा होती. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करत होते. महापूजेसाठी विठ्ठल मंदिराला ब्रिटिशांकडून दोन हजार रुपयांचे वार्षिक अनुदानही दिले जात असे. याआधी १८४० मध्ये विठ्ठलाच्या महापूजेचा मान सातारच्या गादीला मिळाला. पेशवाईत थोरले बाजीराव पेशवे यांनी विठ्ठलाची देवस्थान समिती स्थापन केली. ही समितीचे पुढे विठ्ठलाची महापूजा करत होती.

संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आल्यानंतर मंत्र्यांनी महापूजा करायला सुरुवात झाली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आल्यानंतर महसूलमंत्री राजारामबापू पाटील यांनी आषाढी एकादशीची पहिली महापूजा केली. १९६३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी मुख्यमंत्री असताना, तर १९७७ मध्ये वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना ही महापूजा केली. शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा ही शासकीय पूजा असल्याचे जाहीर केले. नंतर राज्याचे मुख्यमंत्री महापूजा करणार अशी परंपरा निर्माण झाली.

सर्वाधिक वेळा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान काँग्रेसच्या विलाराव देशमुख यांना मिळाला. त्यांनी सहा वेळा विठ्ठलाची महापूजा केली. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी चार वेळा हा मान मिळाला होता.