पंढरपूर (प्रतिनिधी) : राज्याची भरभराट होऊन शेतकरी व कष्टकरी यांना यश मिळावे. राज्यात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. जगावरील कोरोनाचे संकट  दूर होऊ दे. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी,  असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सावळ्या विठुरायाच्या चरणी घातले.

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील सोनखेड तालुक्यातील कोंडीबा टोणगे, प्रयागबाई कोंडीबा टोणगे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला.

विठ्ठलाच्या आशीर्वादाने राज्यावर आलेले कोरोनाचे संकट कमी होत असून येणाऱ्या काळात संपूर्ण जगातून कोरोना नाहीसा होवो, हीच विठ्ठला चरणी प्रार्थना आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने मंदिर विकासाच्या आराखड्यासह केलेल्या विविध मागण्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.