कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी अंबाबाईचा नवरात्र उत्सवाच्या सांगतेला दरवर्षी होणारा श्विन पौर्णिमेचा महाप्रसाद यंदा कोरोनामुळं रद्द करण्यात आला असून हा प्रसाद साध्या पद्धतीने नैवेद्य स्वरूपात सेवकांकरीता होणार आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करु नये, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, दरवर्षी करवीर निवासिनी अंबाबाईचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने हा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने शासनाचे निर्देशानुसार पार पडला. तर नवरात्र उत्सवाची सांगता श्विन पौर्णिमे दिवशी महाप्रसादाने करण्यात येते. परंतु यंदा कोरोनामुळे हा पौर्णिमेचा महाप्रसाद रद्द करण्यात आला असून अत्यंत साधेपद्धतीने हा प्रसाद नैवेद्य स्वरूपात होणार आहे.

दरम्यान यावर्षी नवरात्रोत्सवाचा श्विन पौर्णिमेचा महाप्रसाद करवीर निवासिनी अंबाबाई या नावाने जर कोणी त्रयस्थ व्यक्ती, संस्था किंवा संघटना करत असेल किंवा असा महाप्रसाद वाटप अथवा अन्य मार्गाने भाविकांपर्यंत पोचत असेल तर याला जबाबदार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राहणार नाही, याची नोंद घ्यावी.