नूल (प्रतिनिधी) : श्रीशैल पीठामार्फत काढण्यात येणारी महापदयात्रा, विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम व जनजागृती मेळाव्यात महाराष्ट्रातील सदभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्वर मठामध्ये आयोजित केलेल्या सदभक्तांच्या मेळाव्यामध्ये श्रीशैल जगद्गुरु बोलत होते. यावेळी मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, गौरीशंकर शिवाचार्य स्वामीजी, आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जगद्गुरु पुढे म्हणाले, २९ डिसेंबर २०२२ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान श्री क्षेत्र येडूर ते श्रीशैलपर्यंत पदयात्रा निघणार आहे. या पदयात्रेत वृक्षारोपण, सामुदायिक विवाह सोहळा, राष्ट्रीय वेदांत संमेलन, राष्ट्रीय वचन संमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील भक्तांनी सहभागी होऊन धार्मिक सेवा करावी, असे आवाहन जगद्गुरुंनी केले. सुरगीश्वर मठामार्फत गुरुसिद्धेश्वर स्वामीजी करत असलेली धर्मसेवा अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. राजेश पाटील यांनी रामपूरवाडी येथील सिद्धेश्वर मठाच्या सभागृहासाठी बारा लाख रुपयांचा निधी जाहीर केला. गुरुसिद्धेश्वर स्वामी यांनी श्रीशैल पीठाच्या सामाजिक धार्मिक उपक्रमांमध्ये तन मन धनाने सद्‌भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. सुरगीश्वर सेवा संघटनेचे सेवक व सैन्य दलातील माजी सैनिकांचा जगद्गुरूंच्या हस्ते सत्कार झाला.

श्रीगुरु चंद्रशेखर शिवाचार्य वेद अगम पाठशाळेच्या नामफलकाचे अनावरण जगद्गुरूंच्या हस्ते झाले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विनोद नाईकवाडी यांनी प्रास्ताविक केले. संजय थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमास गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, सरपंच प्रियांका यादव जयसिंग चव्हाण सोमगोंडा आरबोळे मुरगय्या स्वामी, माणिक स्वामी, ईश्वर स्वामी प्रकाश हिरेमठ आदींसह यात्रा समितीचे पंच, मठाचे शिष्य, भक्तगण व ग्रामस्थ उपस्थित होते.