कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिका घरफाळा आणि पाणीपट्टीमध्ये वाढ करणार असल्याचे समजते. वास्तविक कोरोनासारख्या महामारीमुळे लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर अनेकांचे रोजगार, व्यवसाय बुडाले होते. यातून नागरिक हळूहळू सावरत असताना महापालिका अशा प्रकारचे अन्यायकारक कर लादत आहे. ही प्रस्तावित करवाढ मागे घ्यावी, अन्यथा महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने देण्यात आला. महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना आज (बुधवार) याबाबतचे निवेदन देण्यात आले.

शहराचा विकास आराखडा न आखता महानगरपालिका प्रशासन शहरातील जनतेवर अन्यायकारक कर लादत आहे. वास्तविक प्रशासनाने घरफाळा, पाणी बिल घोटाळा, पार्किंग घोटाळा, थेट पाईप लाईन घोटाळा त्याचप्रमाणे शहराच्या विकासासाठी आलेला निधी कोठे गेला, छत्रपती राजाराम टिंबर मार्केटमध्ये यात्री निवास उभारण्यास परवानगी का दिली, याचा खुलासा करावा. पाणी गळती, अनधिकृत पाणी कनेक्शन, वाढती अतिक्रमणे, रस्त्यांची दुरवस्था, आरक्षित जागांतील घोटाळे या समस्या सोडवाव्यात. मगच करवाढ करावी, अन्यथा महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला.

या वेळी संघटनेचे गणेश लाड, अजित पाटील, नितेश कुलकर्णी, अनंत जोशी, संग्राम जाधव आदी उपस्थित होते.