शिरोळ (प्रतिनिधी) : यड्राव येथील महालक्ष्मी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ३६ तासापासून लिक्विड नसल्याने बंद झाल्याने ऑक्सिजन निर्मिती ठप्प झाली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना हा प्रकल्प बंद झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दोन दिवसापूर्वीच खा. धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, माजी आ. उल्हास पाटील यांनी या  प्रकल्पला भेट दिली होती. त्यावेळी ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणाऱ्या लिक्विडचा तुटवडा भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले होते.

परंतु, ३६ तासापासून लिक्विड नसल्याने हा प्रकल्प बंद झाला आहे. या प्रकल्पामधून दररोज ४ टन ऑक्सिजन निर्मिती होते. लिक्विडचा पुरवठा जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली होत असतो. पुणे येथून ९० टन लिक्विड पुरवठा करण्याचा करार आहे. पण कोरोना काळामध्ये पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे  कर्नाटकमधून लिक्विड मागवले जात होते. पण तोदेखील पुरवठा बंद झाला आहे. सध्या ऑक्सिजनची मागणी वाढली असताना पुरवठा होत नाही. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.