साळवण (संभाजी सुतार)  : जिल्हा बँक (केडीसीसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वातावरण तापू लागण्यास सुरूवात झाली आहे. पडद्यामागच्या घडामोडींना वेग आला असून गगनबावडा तालुक्यातील एकेकाळचे  माजी आ. महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते   पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गोटात दाखल झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री यांची  डी. वाय. पाटील कारखान्यांवर भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली.    

गगनबावडा तालुक्यात एकूण  ६८ सहकारी सेवा संस्था जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पात्र आहेत.  केडीसीसी बँकेचे संचालक पी. जी. शिंदे व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातील राजकारणाने उकळी घेतली असून एका एका ठरावासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. जिल्हा बँकेच्या मागील  सर्व निवडणुकीत सतेज पाटील गटात व शिंदे गटात काट्याची टक्कर झाली  होती. परंतु एकवेळ वगळता पी. जी. शिंदे यांनी  बँकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा दौरा करून कार्यकर्त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात कामाला लागण्याच्या सूचना  दिल्या.  तर यावेळी तालुक्यातील   महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेना समर्थक ठरावधारकांनी सतेज पाटील यांची भेट घेतल्याने पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. पालकमंत्री पाटील यांनी साखर कारखान्यावर सर्व कार्यकर्त्यांना बोलावून ठरावधारकांशी बंद खोलीमध्ये चर्चा केली. यावेळी कोणालाही खोलीमध्ये प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे चर्चेचा तपशील  गुलदस्त्यातच राहिला.

यावेळी गोकुळ संचालक बयाजी शेळके,  जि. प. सदस्य भगवान पाटील,  सभापती संगिता पाटील,  माजी पंचायत समिती सदस्य बाळासो कांबळे  (तळये),  संजय पडवळ,  एम. जी. पाटील  (धुंदवडे),  चंद्रकांत पडवळ,  मानसिंग पाटील, राजाराम पाटील (मांडूकली),  निवृत्ती म्हाळुंगेकर (निवडे),  रमेश टक्के (शेणवडे),  बंडा पडवळ,  डी. जी. पाटील,  पांडुरंग खाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.