कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेसने २०१९ च्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन मोंदीनी पूर्ण केले. यामुळे जळफळाट होवून काँग्रेस सध्या कृषी सुधारणांना विरोध करत आहे, अशी टीका भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांनी व्टिटरवरून केली आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शहरातून काँग्रेसतर्फे आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर महाडिक यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीय विरोधक काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

राजकारणात मंत्री पाटील आणि महाडिक राजकीय विरोधक आहेत. यामुळे एकमेकांवर राजकीय आरोप, प्रत्यारोप करण्यात दोघेही संधी शोधत असतात. दरम्यान, केंद्र सरकारने महिन्यापूर्वी तीन कृषी विधेयके मंजूर केली. ती शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षातर्फे त्यास विरोध केला जात आहे. याउलट भाजप ही विधेयके कशी शेतकरी हिताची आहेत, हे सांगत आहे. या विधयेकांना विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे शहरातून ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले. त्याची तयारी दोन दिवसांपासून सुरू होती. अशावेळी माजी आमदार महाडिक यांनी व्टिटरवरून टीका केली. कोल्हापूरचा शेतकरी अपप्रचाराला बळी पडणार नाही. त्यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. रॅलीच्या दरम्यानच महाडिकांची ही टीका राजकीय वर्तुळात विशेष चर्चेत आली आहे.