‘गोकुळ’साठी महादेवराव महाडिक यांच्या थेट ‘जोडण्या’..!

0
6050

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केलीय. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज (मंगळवार) सकाळी ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची त्यांच्या इचलकरंजी येथील निवासस्थानी भेट घेतली. यामुळे महाडिक जरी शांत असले, तरी त्यांचे काम थेट सुरु असल्याचे यातून दिसून येत आहे.

गोकुळ निवडणुकीसाठी दोन्हीकडील नेत्यांनी उघडउघड प्रचार न करता सध्यातरी छुप्या प्रचारावर आणि भेटीगाठीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर महादेवराव महाडिक यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. या चर्चेतील माहिती अजून बाहेर आली नसली, तरी ही चर्चा गोकुळसाठीच असल्याचे बोलले जात आहे. महादेवराव महाडिक यांनी अजून गोकुळच्या बाबतीत कोणतेही विधान केलेले नाहीय. पण, नेत्यांशी आणि मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांनी आपले काम जोरदार सुरु ठेवले आहे, हेच यातून दिसून येत आहे.

कोणत्याही परिस्थितीत गोकुळवरची पकड ढिली झाली नाही पाहिजे. यासाठी दोन्ही बाजू झपाटून कामाला लागल्या आहेत. आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असेल, याविषयी राजकीय चर्चांना उधाण आले आहे.