मुंबई (प्रतिनिधी) : दोन मिनिटांत होणारी आणि क्षणातच पोट भरणारी मॅगी म्हणजे ट्रेकला जाणाऱ्यांपासून बालमित्रांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. संपूर्ण जगभरात मॅगीवर जीवापाड प्रेम करणारी मंडळी आहेत. मॅगीचं रुप एक असलं तरीही तिच्यापासून बहुविध पदार्थ तयार करण्याला अनेकांचीच पसंती असते.

मॅगी पकोडा, मॅगी पराठा, एग मॅगी वगैरे वगैरे… पण तुम्ही कधी मॅगी मिल्कशेक हा पदार्थ ऐकलाय का?  ऐकूनच कसंतरी झालं ना?  इथं प्रत्यक्षात मॅगी मिल्कशेक नावाची विचित्र डिश अस्तित्वात असून ती कमालीची व्हायरलही होत आहे.

मिल्कशेकची चव माहित नाही, पण या फोटोनेच अनेकांचे डोळे फिरले. या फोटोमध्ये मिल्कशेकने भरलेला एक ग्लास दिसत असून, त्यावर मूठभर मॅगी टाकलेली दिसत आहे. आता मिल्कशेक आणि मॅगीचा तसा दूरदूरपर्यंत संबंध नाही. पण, इथं मात्र कोणी एका मास्टरशेफने थेट मॅगी मिल्कशेकच तयार केला आहे. ज्यामुळे आता भल्याभल्यांची भूकही पळाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.