कागल (प्रतिनिधी) : राज्य सरकारने मिनी लॉकडाऊनबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्वसामान्य जनता व व्यापार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय शिथिल करण्याबाबत आपण स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.

घाटगे म्हणाले की, राज्य सरकारने लॉकडाऊनऐवजी इतर उपाययोजना करून  कोरोना प्रतिबंधाचे काम करावे. अन्यथा लॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर, छोटे उद्योजक, कारागीर, बारा बलुतेदार व हातावर पोट भरणारा कामगार वर्ग यांना आर्थिक सहकार्य मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने डॉक्टर, परिचारिका, व्हेंटीलेटर बेडस्, हॉस्पीटल आदीच्या संख्येत वाढ करणे अत्यावश्यक होते. परंतु लॉकडाऊन लावण्याची वेळ येणे हे शासनाचे अपयश आहे. शनिवार, रविवार सोडून इतर दिवशी दुकाने सुरू करण्याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तरी सर्वसामान्यांच्या या प्रश्नात आपण स्वतः लक्ष घालावे, अशीही मागणी घाटगे यांनी  यावेळी केली.