‘आगे आगे देखो होता है क्या’: भाजप आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट 

0
213

मुंबई (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चुरशीची लढाई होणार असली तरी मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

यावेळी लाड यांनी राज ठाकरे यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही. या भेटीनंतर मनसेशी भाजप युती करणार का? असा सवाल लाड यांना केला असता, त्यावर ‘आगे आगे देखो होता है क्या’ अशी प्रतिक्रिया देत, आगामी महापालिका निवडणुकीत भाजप मनसेसोबत आघाडी करण्याचे सूचक संकेत लाड यांनी दिले. राज ठाकरेंशी माझा कौटुंबिक स्नेह आहे. आजच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे सांगून  शिवसेनेची परंपरागत सत्ता खेचण्यासाठी जे करता येईल ते केले जाणार असल्याचे  लाड यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने आतापासून जय्यत तयारीला सुरूवात केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेण्यास आग्रही आहे.