इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील काही गावांमध्ये शासनाने निश्चित करून दिलेल्या मर्यादेपेक्षा मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन होत आहे. याकडे महसूल यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बेकायदेशीर उत्खनन केलेल्या मातीचे पंचनामे करून संबंधित अधिका-यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टी किसान सेलच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शिरोळ तालुक्यात मौजे कनवाड, शेडशाळ, उदगांव, नांदणी या गावांसह अन्य गावांमध्ये शासनाने मंजूरी दिलेल्या ब्रासपेक्षा ५० पटीने जादा बेकायदेशीर मातीचे उत्खनन करुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला आहे. या प्रकाराकडे शासनाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे. कर्नाटकातून बेकायदेशीर मुरुमाची विनापरवाना डंपरमधून वाहतूक सुरु आहे. याबाबत संबंधित विभागाकडे कारवाईसाठी तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर उत्खनन केलेल्या माती ब्रासचे पंचनामे करुन दोषी असणाऱ्या संबंधित अधिकारी, तलाठी व सर्कल यांच्यावर कारवाई करावी तसेच जादा बेकायदेशीर उत्खनन करण्यात आलेल्या मातीच्या रकमेची संबंधितांकडून वसुली करावी

या आंदोलनात लोकजनशक्ती पार्टी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे गौतम कांबळे, दादासाहेब गायकवाड, शंकर कांबळे, किरण कांबळे, मल्लाप्पा जावळे, दीपक कांबळे यांनी सहभाग घेतला. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी या उपोषणाची दखल घेतली. बेकायदेशीर माती उत्खनन प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची नेमणूक केल्याचे पत्र शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांनी सुनील कुरुंदवाडे यांना सादर केले.