मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात मागील वर्षी याच दिवशी म्हणजे २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊनला सुरुवात झाली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय, रोजगार बुडाले, अर्थव्यवस्थेला जोरदार झटका बसला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार सुरक्षित वावराचे नियम जनतेच्या कानीकपाळी ओरडून सांगत असतानाही काहीजणांच्या बेफिकिरीमुळे पुन्हा कोरोनाचे संकट जास्तच गहिरे होत चालले आहे. राज्यात केवळ मार्चमध्ये ३ लाख ४३ पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे १५ जिल्ह्यांमध्ये सरकारकडून लॉकडाऊन पुकारण्यात येण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगाने होणारा कोरोनाचा प्रसार लक्षात घेतला, तर राज्य सरकार हे पाऊल उचलू शकते. नागपूर, बीडसह काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आधीच लावण्यात आलेला आहे. राज्याचा विचार केला तर मार्च महिन्यामध्ये आतापर्यंत ३ लाख ४३ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३०० जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार किंवा जिल्हा / महापालिका प्रशासन मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, जालना, नांदेड, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पुकारेल, अशी शक्यता आहे.