मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अखेर राज्य मंत्रिमंडळाने आज (रविवार) कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने लॉकडाउन लावण्याबाबत विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल, अशी माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी  दिली.

मलिक यांनी सांगितले की, राज्यात सोमवारपासून कडक नियम लागू होणार आहेत. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असेल, तर दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद राहतील. पण होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार आहेत. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामे सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.