मुंबई (प्रतिनिधी) : देशातील नागरिकांवरील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाहीये. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ८ लाख ८० हजार झाली आहे.  १ लाख ५५ हजार ४४७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर १ लाख ३५ हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण २० लाख ५२ हजार ९०५ रुग्णांची नोंद झाली आहे. या आठवड्यात मुंबईत दररोज ८०० ते ९०० रुग्ण आढळत आहेत. मुंबईप्रमाणे इतर शहरातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळेच राज्यात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात येऊ शकतो, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

काही राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेनं आहेत. तर, अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी कोरोना रूग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे. त्यामुळे, देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे.  रूग्णांच्या संख्येत पुढे असणाऱ्या केरळ आणि महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असली तर लॉकडाऊनचा विचार सरकारनं केलेला नसल्याचं म्हटलं होतं.

मात्र, यानंतर आज छगन भुजबळ यांनी लॉकडाऊनसंदर्भातील संकेत दिले आहेत. छगन भुजबळ म्हणाले, की राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या (Corona Patients In Maharashtra) वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येईल. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन भुजबळ यांनी नागरिकांना केलं आहे.