नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर कोरोना रूग्ण वाढीचा उद्रेक झाला आहे. परंतु देशात पुन्हा कठोर लॉकडाऊन करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. कोरोनाचा कहर वाढत असला, तरी पूर्णपणे लॉकडाऊन करून अर्थव्यवस्था ठप्प केली जाणार नाही. मात्र, स्थानिक पातळीवर कोरोना नियंत्रणासाठी पावले उचलली जातील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. 

स्थानिक पातळीवर कोरोनाबाधितांना गृह विलीगीकरणसारखे पर्याय देऊन कोरोना नियंत्रणासाठी उपाय केले जाणार आहेत. कोरोना रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून पंचसूत्री कार्यक्रम राबवला जात आहे. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी वर्ल्ड बँकेने अतिरिक्त कर्ज देण्याच्या निर्णयाचे सीतारामन यांनी स्वागत केले आहे.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १ मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. आज रात्री ८ पासून संचारबंदी लागू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही कठोर पावले उचलणार का ? याकडे लक्ष लागले असताना देशभरात कठोर लॉकडाऊन लागू केला जाणार नाही, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.