मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर  निर्बंधासह वीकेंड लॉकडाऊनचा प्रयोग केला. परंतु कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची तयारी राज्य सरकारने पूर्ण केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची घोषणा आजच (मंगळवार) होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यावर सर्वच अधिकारी, डॉक्टरांसह तज्ज्ञांचे एकमत झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याचा   राज्य सरकारचा निर्णय जवळपास झाला आहे. परंतु लॉकडाऊन कधीपासून  करायचा याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अधिक वेळ दवडण्यात अर्थ नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनच्या अधिसुचनेची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच या संदर्भातील नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे, असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.