लाईव्ह मराठी स्पेशल : शेतकरी संघाला राजकारणाची लागण ! (भाग – २)

0
239

कोल्हापूर (सरदार करले) : अत्युच्च शिखरावर असलेल्या शेतकरी सहकारी संघाला तात्यासाहेब मोहिते आणि कार्यकारी संचालक बाबा नेसरीकर यांच्यामुळे आर्थिक स्थैर्य आलेच, शिवाय संघ एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. पण, १९८९ नंतर सर्वोच्च शिखरावर असलेल्या संघावर राजकारण्यांची नजर गेली. राजकीय कुरघोडीतून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ आणले. इथे ‘बैल’ बिथरला. संघात राजकारण घुसले आणि त्यानंतर संघाचा बैल दिवसेंदिवस थकत चालला. शेतकरी आणि सभासदांना वाऱ्यावर सोडले. ग्राहकांनी पाठ फिरवली.

शेतकरी संघाच्या शाखांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर पोहचली. सुईपासून नांगरापर्यंत,  बी-बियाणांपासून खतापर्यंत, खाद्यतेलापासून पेट्रोल – डिझेल, औषधं अशा हर एक वस्तू संघाच्या शाखेत मिळत होत्या. लोकही विश्वासाने त्या खरेदी करत. ‘बैल’ छाप म्हणजे विश्वास आणि विश्वास म्हणजे शेतकरी संघ अशी सर्व मान्यता होती. संघावर लोकांचा इतका विश्वास होता की दिवाळी-दसऱ्याला लोक रांगा लावून बैल छाप भांडी खरेदी करत.

संघाचे दहाहून अधिक पेट्रोल पंप होते. त्यापैकी तीन बंद पडले. खत कारखान्यात दाणेदार आणि हँडमिश्रित या दोन प्रकारची खते तयार होत. वर्षाला ४० हजार टन खत तयार होत होते. आता हा खत कारखाना कसाबसा सुरू आहे. भांडी कारखाना बंद पडला. औषध विभागाकडे महत्वाच्या १२५ औषध कंपन्यांच्या एजन्सीज होत्या. भवानी मंडप येथे होलसेल आणि किरकोळ औषध विक्री होत होती. रात्रंदिवस सेवा उपलब्ध होती. सध्या हा विभाग बंद पडला आहे. लक्ष्मीपुरीतील मशिनरी आणि स्पेअरपार्ट विभाग बंद पडला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था संघाकडे होती. ती घडी विस्कटली. एके काळी संघाकडे बाराशे कर्मचारी होते. आता मोजकेच कर्मचारी आहेत. ही मालिका न संपणारी आहे.

सर्वच पक्षातील बेरक्या राजकारण्यांनी आपापल्या बगलबच्चे कार्यकर्त्यांना संचालक म्हणून संघात पाठवायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांची सोय केली. त्याचे शिक्षण, अनुभव, व्यावसायिक दृष्टिकोन, भविष्यातील कल्पना याचा कसलाही विचार न करता त्याला संचालक म्हणून बसवले. राजकीय गणित कसे सुटेल याचा विचार त्यांनी केला. भुरट्यांना संचालक केले. हळूहळू संघाची घसरण सुरू झाली. संघाचा तोटा होतोय हे कुणी लक्षातच घेतले नाही. संघ बुडण्यातच त्यांचा फायदा होता. संघावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले. कर्ज जसे फेडता येईल, याचा गांभिर्याने विचारच केला गेला नाही. संघावरील नियंत्रण सुटले. ‘बैल’ अशक्त होतो आहे याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

(क्रमशः)