लाईव्ह मराठी स्पेशल – स्वरदेवता लता मंगेशकरांच्या वाढदिवसानिमित्त… : मोगरा फुलला !

0 262

आज २८ सप्टेंबर..! इतर दिवसांपेक्षा हा दिवस खूपच ‘स्पेशल’ आहे. ९० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मध्य प्रदेशमधील इंदूर येथे ‘लता’ नावाच्या सुरांच्या देवतेने जन्म घेतला. या स्वरदेवतेने संपूर्ण भारतालाच नव्हे, संपूर्ण जगाला आपल्या गोड गळ्याची मोहिनी घातली जी अजूनही कायम आहे. आपल्या स्वरकिरणांनी आपल्या सर्वांची आयुष्यं उजळवून टाकणा-या या ‘सहस्ररश्मी’समोर कृतज्ञतेचं, आदराचं आणि प्रेमभावाचं एक छोटं ‘निरांजन’ ठेवण्यासाठीच हा छोटासा लेखप्रपंच…

लता मंगेशकरांचा ९० वा वाढदिवस, हा प्रत्येक सच्च्या संगीतरसिकाच्या आयुष्यातला एक आनंद-दिवस आहे. हा दिवस उगवण्याची प्रतीक्षा माझ्यासारखे असंख्य लताप्रेमी मागील काही महिन्यांपासून करत होते. त्यांचे गानकर्तृत्व हे आभाळासारखं अमर्याद आणि सागरासारखं अथांग आहे.

वि.स.खांडेकर यांनी लिहून ठेवलं आहे की,

‘माझ्या जीवनातल्या या अखेरच्या पर्वात, मी संध्याकाळी फिरायला बाहेर पडतो तेव्हा क्षितिजावर पसरलेली, मावळत्या सूर्याची रक्तवर्ण लाली, मनाला आनंद देऊन जाते. पण मी घराकडे परतायला लागतो तेव्हा, डोळ्यासमोर गडद होत जाणाऱ्या अंधारात मला कोणतीही ‘कला’ दिसत नाही. अशा स्थितीत असताना, अवचित दोन गोष्टींमुळे जगण्यात अर्थ आहे हे पुन्हा प्रकर्षाने  जाणवतं…एक म्हणजे ‘रातराणीच्या फुलांचा मंद सुगंध’ …आणि दुसरं ‘दूरवरून कुठूनतरी कानावर येणारं लताचं’ गोड गाणं!”

केवळ एका ‘ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या साहित्यिकाचं’ म्हणून नव्हे, तर त्यातल्या यथार्थतेमुळे हे विधान महत्वाचं आहे. असंख्य रसिकांच्या मनातल्या भावना वि. सं.नी शब्दबध्द केल्या आहेत. आमच्या जीवनाचा ‘सफर’, लतागीतांच्या ‘खुबसूरत साथी’मुळं खरोखरीच ‘सुहाना’ झाला आहे. त्यांच्या गाण्यांनी जीवनातले सुंदर क्षण अधिक सुंदर केले आणि कुरूप क्षण काहीसे सुसह्य केले. ‘कितना हँसी है मौसम कितना हंसी सफर है, साथी है खुबसूरत …’ हीच तिच्या गाण्याबाबत आमची भावना आहे.

‘लता आली आणि आम्हाला ‘देवदूत’ आल्याचा आनंद झाला. ‘गायकांच्या गळ्याच्या क्षमतेचा विचार करून चाली तयार करायचे दिवस इतिहासजमा झाले.”  हे उद्गार आहेत अनिल बिस्वास यांचे! एक प्रकारे,  त्यावेळच्या बहुसंख्य संगीतकारांचं हे मनोगतच होतं ! त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ,  समकालीन आणि नंतरच्या पिढीतल्या अनेक साहित्यिकांनी तिच्यावर लेख लिहिले. अनेक हिंदी-मराठी व इतर भाषेतल्या कवींनी त्यांच्यावर कविता रचल्या.  लताचा स्वर ऐकून पाडगांवकरांसारख्या काहीशा अज्ञेयवादी व्यक्तीला ईश्वराला ‘मानावं’ असं वाटलं. शास्त्रीय संगीतातले थोर कलावंत, जागतिक कीर्तीचे वादक सा-यांनाच या आवाजानं मोहित केलं. ”काश…मेरा व्हायोलिन उनकी आवाजकी तरह बजता..!” असं यहुदी मेन्युहीन यांनी म्हटलं.

लता मंगेशकरांच्या आगमनानंतर अवघ्या काही वर्षांत म्हणजे १९५१ साली, ‘राजा मेहंदी अली खान’ यांना ‘गाए लता गाए लता’ हे गाणं लिहावंसं वाटलं आणि स्वातंत्र्याआधी नूरजहाँच्या आवाजानं झपाटलेल्या के. दत्ता यांना ते संगीतबद्ध करावसं वाटलं. ‘गुलजार’ यांच्यासारख्या संवेदनशील मनाच्या  कवीला या गारुडापासून अलिप्त राहणं शक्यच नव्हतं. लताला डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी, ‘नाम गुम जाएगा …’ हे गाणं रचलं. ‘हे काव्य लिहिताना लताजीच माझ्या मनःचक्षूंसमोर होत्या’ हे गुलजार यांनी वारंवार सांगितलंय .

ज्ञानदेवांनी ‘भगवद्गीता’ काहीशी ‘सुलभ’ करुन घराघरात पोहोचवली. लतादीदींनी, ‘अभिजात’ संगीत ‘सुगम’ करुन मनामनात रुजवलं. दि. २८ सप्टेंबर १९२९ रोजी मराठी सारस्वताच्या प्रांगणात लावलेल्या ‘ईवल्याशा रोपाचा कीर्तीवेलू’  फार पूर्वीच ‘गगनावरी’ गेला आहे. ‘आपकी सेवामें’ या चित्रपटापासून हे गीतांचे धागे ‘गुंफायला’ आरंभ झाला आणि पाहता पाहता, एक भरजरी ‘शेला’ लतानं जनताजनार्दनाच्या सेवेसी अर्पण केला. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत, ही ‘लता’ असंख्य ‘स्वरपुष्पांनी’ फुलून आली. मोगऱ्याच्या सुवासासारखाच, या स्वरपुष्पांचा गंध अनिर्वचनीय आहे. ज्या काळात, लताच्या अद्वितीय गळ्याचा ‘मोगरा फुलला’ त्याच काळात आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्य! ही ‘फुले वेचिता’ आमची छोटीशी परडी ओसंडून वाहते आहे. या मोग-याच्या सुगंधानं जीवन तृप्त झालं आहे.

फक्त ‘स्मृतिभ्रंश’ झाला तरच लताचा आवाज विसरणं शक्य आहे. त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाला त्यांना भरभरून शुभेच्छा देण्याचं भाग्य, या स्वरयात्रेतल्या प्रत्येक वारकऱ्याला प्राप्त होवो,  हीच ‘बाप रखुमादेवीवरु श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना !

– धनंजय कुरणे  
(लेखक कोल्हापुरातील विख्यात ‘स्मृतिगंध लिसनर्स क्लब’चे संयोजक आणि ध्वनिमुद्रिका संग्राहक आहेत.  मो. 9325290079)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More