अलविदा दिलीपकुमार…

0
114

कोल्हापूर : (विजय पोवार) :  दिलीपकुमार उर्फ युसुफखान ! अभिनेता, बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार, ट्रॅजेडीकिंग, भारतीय चित्रपटसृष्टीत सुरुवातीपासून चमकणारा हा तेजस्वी तारा आज (बुधवार) वयाच्या ९८ व्या वर्षी निस्तेज होऊन लोप पावला. तत्कालीन हिंदुस्थानमधील पेशावर शहरात जन्मलेला हा युसूफ खान पठाण कुटुंबासमवेत महाराष्ट्रात आला. त्याने मुंबईत नशीब आजमावले आणि भारतीय सिनेमा क्षेत्रावर अधिराज्यही गाजवले. 

अभिनयाची उत्तम जाण असलेल्या या अभिनेत्याला स्वातंत्र्यानंतरही जन्मभूमी म्हणून पाकिस्तानमधील पेशावर बद्दल ममत्व होते, पण म्हणून त्यांनी आपला हिंदुस्थान सोडून पाकिस्तानवर प्रेम केले नाही. भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळ सुरु झाला तोच मुळात दिलीपकुमार यांच्या कारकिर्दीने. त्यांचे समकालीन राजकपूर, देवानंद, राजेंद्रकुमार आपल्या आपल्या परीने चित्रपटसृष्टी गाजवून गेले. पण प्रेक्षकांकडून ‘सुपरस्टार पद’ मिळाले ते दिलीपकुमार यांनाच. त्यानंतर राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनाही प्रेक्षकांनी सुपरस्टार बनवले. पण दिलीपकुमार यांनी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात आणि त्यानंतरही त्यांनी सप्तरंगी आणि भव्य  सिनेमास्कोप पडदे व्यापून टाकले होते.

आम्हाला तसा सिनेमा कळायला लागला तेव्हा राजेश खन्नाचा सुपरस्टार म्हणून जमाना होता. तर सिनेमे आवडीने आणि छंद म्हणून पाहतानाचा काळ अमिताभ बच्चन सुपरस्टार होण्यापर्यंत राहिला. जेव्हा जुने सिनेमे, जुनी अवीट गाणी यांची आवड निर्माण झाली तेव्हा मात्र दिलीपकुमारचे सिनेमे, त्यांची ट्रॅजेडी हेच पहात होतो. गोपी, राम और शाम, यहूदी, मधुमती, मुघल-ए-आझम, लीडर, नया दौर, देवदास हे चित्रपट त्यांच्यासाठी मैलाचे  दगड ठरले. त्यांचा पहिला चित्रपट कोणता आणि शेवटचा कोणता याला फारसे महत्त्व नाही. वयापरत्वे हिरोची भूमिका मागे पडताना त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू केली.

शक्ती, कर्मा, विधाता, मशाल अशा नव्या पिढीबरोबरच्या नव्या जमान्यातील चित्रपटातही ते अभिनयात सरसच ठरले. अभिनेत्री सायराबानो ही त्यांची पत्नी. लग्नाच्या वेळी त्यांच्यात वयाचे अंतर २२ वर्षाचे. पण सायराबानूने अल्पवयात चित्रपट कारकीर्द सुरू केली. ‘कश्मीर की कली’ वाटणारी सायराबानू चित्रपटात मात्र शम्मी कपूर ते जॉय मुखर्जी, नवीन निश्चल अशा ठोकळेबाज हिरोबरोबर काम करत दिलीपकुमारपर्यंत पोहोचली. आणि आपल्या वास्तविक जीवनात मात्र तिने बॉलिवूडचा सुपरस्टार मिळवला. त्यानंतर सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांच्यासोबत ती राहिली. मृत्यूपर्यंत तिची साथ कायम राहिली. (नाहीतर आजचे आपले आमिर-किरण, सैफ-अमृता सिंग आणि इतर…) ज्या वेळी दिलीपकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या बातम्या येत होत्या तेव्हा ती आवर्जून त्यांच्यासोबत दिसत होती. अगदी शेवटपर्यंत तीच निष्ठा आणि तेच प्रेम.

दिलीपकुमार प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांना राज्यसभेचे खासदार पद मिळाले. मुंबई शहराचे  सन्माननीय ‘शेरीफ’ पद मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध… त्यांचे एकत्र बिअर पिणे हा त्या वेळी चर्चेचा विषय होता. याबाबत एका मुलाखतीत विचारले गेले होते त्या वेळी बाळासाहेब म्हणाले होते की, ‘आजही बिअर आहे, चणे आहेत पण सोबत दिलीप कुमार नाही’. यावरून त्यांच्यातील अंतर स्पष्ट झाले, पण आंतरिक मैत्रीही त्यातून स्पष्ट होती. तब्बल ९८ वर्षाचे सोनेरी-चंदेरी आयुष्य जगून दिलीपकुमार आज निघून गेलेत आणि बॉलीवूडमधील एका पर्वाचा अस्त झालाय.

दिलीपकुमार आणि कोल्हापूरचे ऋणानुबंध… 

दिलीपकुमार यांचे आज निधन झाले. यानिमित्ताने कोल्हापूरकरांनीही त्यांच्या स्मृती जागवल्या. कागलच्या माळावर ‘राम और शाम’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. या वेळी त्यांनी कागलबद्दल गाण्यात उल्लेख केला होता. याचवेळी त्यांनी कोल्हापूरची झुणका भाकर आणि मटणाच्या जेवणाची तारीफ केली होती. जयप्रभा स्टुडिओ आणि चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची भेट याच्याही स्मृती आज जाग्या झाल्या. ते कोल्हापुरात आले असताना येथील पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती आणि भेटीच्याही स्मृती जागवल्या.