‘लाईव्ह मराठी’ इम्पॅक्ट : अखेर हातकणंगलेतील ‘त्या’ दोन पोलिसांची बदली

0
49

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वेश्या व्यवसाय प्रकरणातील एजंटला मदत केल्याचा ठपका ठेवत हातकणंगले पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे. या बदलीमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘संशयित दलालासोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे हातकणंगले पोलीस चर्चेत’ या मथळ्याखाली ‘लाईव्ह मराठी’ने ९ फेब्रुवारीरोजी व्हिडिओ न्यूज प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.     

हातकणंगले येथील कोल्हापूर-सांगली राज्य मार्गवर एका मंदिराशेजारी अमर माळवे यांच्या भाडोत्री घऱामध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी एजंट ज्ञानेश्वर सावंत (रा. अमोल बेकरीजवळ कोरोची) हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. दरम्यान, पोलीस ठाण्यासमोर ज्ञानेश्वर सावंत यांची चहा टपरी आहे. येथे पोलिसांचा सतत वावर असतो. सावंतने स्वत:च्या फेसबुकवरील प्रोफाईलवर दोन पोलिसांसोबतचा फोटो २७ जानेवारी २०२१रोजी अपलोड केला होता. याच दोन पोलिसांनी सावंत याला पळून जाण्यास मदत केल्याची चर्चा सुरू झाली होती.

याबाबत ‘लाईव्ह मराठी’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर या पोलिसांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर एक महिन्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत त्यांची बदली करण्यात आली आहे.  दरम्यान, आरोपी आणि ‘त्या’ दोन पोलिसांनी वारंवार या वेश्या अड्ड्यावर रंगील पाट्या केल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरातील नागरिकांतून होऊ लागली होती. भागीदारीत वेश्या व्यवसाय असल्यामुळेच दलाल ज्ञानेश्वर सावंत याला अटक  न करता त्याला पळून जाण्यास त्या दोन पोलिसांनी मदत केल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.