लाईव्ह मराठी इम्पॅक्ट : अखेर म्हासुर्लीत रुग्णवाहिका दाखल

0
52

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड आरोग्य केंद्रातंर्गत  येणाऱ्या वाड्यांवस्तीत विभागलेल्या म्हासुर्ली उपकेंद्रास दिड महिन्यापूर्वी रुग्णवाहिका मंजूर झाली होती. तरी देखील ती दुसऱ्या आरोग्य केंद्रात हस्तांतरीत करण्यात आली. यासंदर्भात सर्वप्रथम ‘लाईव्ह मराठी’ने याचे वृत्ताकंन केले होते. याची दखल घेत आज (सोमवार) म्हासुर्लीला रुग्णवाहिका देण्यात आली.

‘लाईव्ह मराठी’च्या वृत्ताची दखल घेत म्हासुर्लीचे उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील यांना ताबडतोब रुग्णवाहिका न दिल्यास सर्व सदस्यांना सोबत घेऊन जि.प.च्या समोर उपोषण करणार असे निवेदन दिले होते. याची दखल घेत या विभागाचे जि.प.चे सदस्य विनय पाटील यांच्या प्रयत्नातून म्हासुर्ली येथे रुग्णवाहिका आणण्यात आली.

यावेळी उपसरपंच पाटील यांनी, गेल्या वर्षी म्हासुर्ली शेजारील धनगर वाड्यावरील सर्पदंशाने एक लहान मुलगा आणि एक गरोदर महिला या दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला होता. या संदर्भातही ‘लाईव्ह मराठी’ने वारंवार आवाज उठवल्याबद्दल विशेष कौतुक केले.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील, जि.प. सदस्य विनय पाटील, सरपंच मिना कांबळे, राष्ट्रवादी तालूकाध्यक्ष किसन चौगले, ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.