मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातल्या शहरांमध्ये आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर आता पहिलीपासूनच्या शाळा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिलीपासूनचे वर्ग सुरू कऱण्यास शालेय शिक्षण विभाग अनुकूल असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक शाळा सुरू कऱण्याच्या संदर्भात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच शिक्षण विभागाचे सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभाग प्राथमिक शाळा सुरू करण्यास अनुकूल असल्याचं बोललं जात आहे.

येत्या पंधरा दिवसांत प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच पुढील महिन्यात किंवा जानेवारी महिन्याच्या शेवटी प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यात येतील असंही सुत्रांकडून समजले आहे.