परवानाधारकांना शस्त्रे जमा करावी लागणार…

0
103

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील परवानाधारकांना आपली शस्त्रे पोलिसांकडून जमा करून घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील चारही पोलीस ठाण्याबरोबरच शहराला लागून असलेल्या करवीर तालुक्‍यातील काही गावांतील शस्त्रेही जमा करावी लागणार आहेत.

प्रत्येक निवडणुकीतील चुरस लक्षात घेता पोलिसांनी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस ठाणेनिहाय परवानाधारक शस्त्रे असलेल्या लोकांना संपर्क साधून त्यांच्याकडील शस्त्रे जमा करण्यास सांगण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याकडे त्यांच्या हद्दीत असलेल्या शस्त्र परवानाधारकांची नावे आहेत.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात पोलिसांपेक्षा नागरिकांकडे शस्त्रे किंवा परवाने जास्त आहेत. शस्त्र परवाना घेताना पोलिसांचा ना-हरकत दाखल लागतो. आता तर शस्त्रांसह परवानाधारकांची नोंद थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केलेली आहे. त्यासाठीचा संपूर्ण ‘डाटा’ पोलिसांकडे उपलब्ध आहे. जे परवानाधारक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक निवडणूक लढवणार आहेत.

पहिल्या टप्प्यात अशा लोकांची शस्त्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सुरुवातीला फोनवरून संपर्क साधून शस्त्रे जमा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातूनही काहींना शस्त्रे जमा न केल्यास त्यांची शस्त्रे पोलीस घरी पाठवून जप्त करण्यात येणार आहेत.