कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  मात्र, काही वाहनचालकांकडून दंडाची रक्कम  भरण्याकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ केली जात आहे. तरी मार्च महिन्यात होणाऱ्या लोक अदालतीमध्ये दंडाची रक्कम न भरल्यास परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला आहे.

राज्य सरकारने वाहतूक अधिनियमात  ११  डिसेंबरपासून बदल करत  दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यानुसार वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या  दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाढीव दंडाच्या रकमेची माहिती होण्यासाठी शहर वाहतूक शाखेने शहरात प्रबोधन केले आहे. तसेच दंडाची रक्कम लोक अदालतीमध्ये तडजोड करून भरण्याचे आवाहन वाहतूक  पोलिसांनी केले होते. पण काही वाहनधारकांकडून दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली जात आहे.

दरम्यान, मार्च महिन्यात  लोक अदालतीचे आयोजन केले आहे. तरी यावेळी  वाहनधारकांनी दंडाची रक्कम भरून सहकार्य करावे. अन्यथा, तीनपेक्षा अधिक वेळा  वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा  इशारा बलकवडे यांनी दिला आहे.