कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोबाईल व इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टींचे ज्ञान मिळविण्यासाठी करा. सोशल मीडियाचा वापर योग्य माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी करा. आपल्या आवडत्या क्षेत्रात उत्तम करिअर करा आणि आपल्या आई-वडिलांचं, गावाचं व देशाचं नाव उंचवा,’ असा मोलाचा मंत्र आज (मंगळवार) क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे  मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते शासकीय अनुदानातून विद्यार्थिनींसाठी मिळालेल्या कबड्डी मॅट व व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होते. यावेळी क्रीडा क्षेत्रात जिल्हा व राज्य पातळीवर यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार तसेच संस्थेच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्या पुढे म्हणाल्या की, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. इचलकरंजी ही ‘खो-खो खेळाची पंढरी’ मानली जाते. खेळ आणि खेळाडू यांच्याद्वारे इचलकरंजीचे नाव अधिक उंचावण्यासाठी निश्चितच प्रयत्न करु. तसेच यादृष्टीने क्रीडा विषयक अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन हरीश बोहरा, उपाध्यक्ष उदय लोखंडे, सचिव बाबासाहेब वडींगे, मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर आदीसह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थिनी  उपस्थित होत्या.