मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटकची एक इंचही जमीन कुणाला दिली जाणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी म्हटले होते. आता कन्नड भाषिकांची संख्या जास्त असलेले महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली कर्नाटकात सामाविष्ट करण्याचा प्रयत्न करू, असा इशारा कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना अभिवादन करताना म्हटले होते. यावर उत्तर देताना कर्नाटकचे गृहमंत्री बोंमई यांनी वल्गना केली आहे.

बंगळुर येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोंमई म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत सीमावादावर न्यायालयात आमची बाजू सिद्ध झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या राज्याची भूमी सोडणार नाही. परंतु कन्नड भाषिकांची संख्या जास्त असलेले महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली कर्नाटकात सामाविष्ट करण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी म्हटले आहे. आता यावरून दोन्ही राज्यातील सीमावाद उग्र स्वरूप घेण्याची शक्यता आहे.