मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळातील अव्वाच्यासव्वा वीजबिलांबाबत जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ही बिले भरताच येणार नाहीत, अशीच अवस्था राज्यातील बहुतांशी ग्राहकांची आहे. यामुळे लॉकडाऊन काळातील घरगुती व शेतीपंपाची वीजबील माफी करण्यासंदर्भात सरकारने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्याकडे केली. या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवत पवार यांनी योग्य तोडगा काढण्याची ग्वाही दिली.   

देशातील केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील शासनांनी घरगुती वीज बिलांमध्ये ५० टक्के सवलत देऊन जनतेला दिलासा दिला आहे. पण पुरोगामी व प्रगत महाराष्ट्र सरकारने अद्यापही याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर दुसरीकडे महावितरण, बेस्ट तसेच अदानी, टाटा पॉवर या सारख्या खासगी वीज कंपन्यांनी पुढील दरमहा वीज देयके ग्राहकांना पाठविली आहेत. तसेच थकबाकी भरण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली आहे. तर महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीसा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर दरमहा ३०० युनिटसपर्यंत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावीत. तसेच कृषीपंपाची ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०२० या ५ वर्षांतील थकबाकीवरील व्याज आकारणी रद्द करण्यात यावी. या मागणीबाबत शरद पवार यांनी अनुकुलता दर्शवित याबाबत लवकरात लवकर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे बाबासो पाटील भुयेकर, विक्रम पाटील किणीकर, रावसाहेब तांबे, शैलेश चौगुले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.