कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा उभा करूया : ना. हसन मुश्रीफ  

कागलमध्ये बांधकाम कामगारांचा विराट मेळावा   

0
116

कागल (प्रतिनिधी) : केंद्रातील भाजप सरकारने कामगारांच्या सुरक्षिततेचे ४४ कायदे रद्द करून कामगारांना उद्ध्वस्त करुन अक्षरश: देशोधडीला लावले आहे. कामगारांना  न्याय मिळवून देण्यासाठी आता लढा उभा करूया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. केंद्रातील भाजप सरकार आणि भाजप राजवट असलेल्या राज्य सरकारांनी कामगारांची परवड केली, असेही ते म्हणाले. कागलमध्ये आयोजित बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व लाल बावटा बांधकाम कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सिटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, महाराष्ट्रात बांधकाम कामगार कायदा १९९६ मध्ये मंजूर होता. परंतु, आपल्या कामगार मंत्रिपदाच्या काळात या असंघटित बांधकाम कामगारांसाठी इमारत बांधकाम कामगार मंडळ स्थापन केले. या माध्यमातून  गवंड्यासह, पाया खुदाई मजूर, दगडफोड्या, प्लंबर आदी कामगारांचे कोटकल्याण केले. कामगारांना वयाच्या साठ वर्षानंतर सेवानिवृत्ती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू. तसेच कामगारांच्या बंद पडलेल्या मेडिक्लेम योजना सुरू करण्यासाठीही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे, सीटू संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम, आजरा तालुकाध्यक्ष प्रकाश कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. कामगार आयुक्त संदेश अहिरे यांनी कामगारांविषयीच्या विविध योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मोहन गिरी यांनी स्वागत केले. रामचंद्र सुतार यांनी सूत्रसंचालन यांनी केले. विक्रम खतकर यांनी आभार मानले.