कर्नाटक शासनाशी समन्वय ठेवून महापुराला सामोरे जाऊ : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

0
17

शिरोळ (प्रतिनिधी) : या वर्षी पावसाचा अंदाज पाहता महापुराचे संकट ओढवू शकते. महापूर येऊ नये अशीच माझ्यासह सर्वांची भावना आहे. पण तो आलाच तर कर्नाटक सरकारशी समन्वय साधत महापूर कसा टाळता येईल याबाबतच्या संभाव्य उपाययोजना पूर्ण केल्या जातील. असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले. ते शिरोळ तालुका मान्सूनपूर्व आढावा बैठकीत जयसिंगपूर येथे बोलत होते.

ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले की, सन २०१९ पेक्षा २०२१ चा महापुर शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी सर्वाधिक नुकसानीचा ठरला. आज प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभाग प्रमुखांनी मागील सर्व महापूरांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी या संकटाला सामोरे जाण्याची मोठी तयारी केली आहे. जनतेवर आलेल्या संकटाच्या प्रसंगी जबाबदारीने काम करणाऱ्यांचे कौतुक होईल. पण जाणून-बुजून चूक करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून विशेषता महिला वृद्ध व बाल रुग्णांबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. ज्या रस्त्यांवर पाणी येते त्या रस्त्यांवरील पाण्याची खोली दर्शवणारे फलक बांधकाम विभागाने उभारावेत अशा सूचनाही दिल्या. कर्नाटक शासन नव्याने उभा करीत असलेल्या नदीवरील पुलांच्या भरावाबाबत पालकमंत्री सतेज पाटील आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री दोन्ही राज्यांचे प्रमुख मंत्री आणि लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांच्या सोबत लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल असेही सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.