रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियान वर्षभर करु : पालकमंत्री

0
70

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रस्ते अपघात कमी होण्यासाठी आणि मृत्यू रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रबोधन करु या. महिनाभर अभियान राबविण्यापेक्षा रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियान वर्षभर राबवू आणि स्वयंशिस्त लावू या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ते सडक सुरक्षा जीवन रक्षा ३२ व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते प्रबोधन फलक गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, रस्ता सुरक्षा सप्ताहावरुन पंधरवडा आणि आता महिनाभर अभियान राबविण्यात येत आहे. मागील वर्षी देशात साडेचार लाख अपघात झाले आहेत. त्यामध्ये दिड लाख मृत्यू झाले आहेत. म्हणजे दिवसाला ४१४ लोकांचा मृत्यू देशात होत आहेत. वाहन परवाना देतानाच कडक नियमांची अंमलबजावणी करा. त्याचबरोबर प्रबोधन, जनजागृती यावर सर्वांनीच भर द्यायला हवा. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वत:लाच शिस्त लावून घ्यायला हवी.

पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, स्वयंस्फुर्तीने नियमांचे पालन होणं यावर पोलीस दल भर देत आहे. गतवर्षी अपघाताचे ३१३ गुन्हे दाखल आहेत. यावर्षी हे प्रमाण कमी कसे करता येईल यावर पोलीस दर भर देत आहे. स्वयंशिस्त पालून सर्वांनी योगदान द्यावे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी अपघातमुक्त कोल्हापूरसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती माहिती पुस्तिका आणि स्टिकर्सचे प्रकाशन यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.