कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील १३ गावांचे पाणी बंद केल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय बंद करू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आज (मंगळवार) दिला.

या योजनेतील १३ गावांचा पाणीपुरवठा थकबाकीसाठी तोडण्यात येईल, अशी नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने संबंधित ग्रामपंचायतीना दिली होती. त्याच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार व करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कोल्हापुरातील प्राधिकरणाच्या कार्यालयात याबाबत जाब विचारला.

तालुका प्रमुख राजू यादव व पोपट दांगट म्हणाले की, थकबाकीचे कारण पुढे करून पाणीपुरवठा तोडू नये. संबंधित ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन त्यांच्या येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात यावी. थकबाकीसाठी पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस काढण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे क्रमप्राप्त होते. पण तसे आपल्याकडून झालेले नाही ही बाब गंभीर आहे, असे खडेबोल शिवसैनिकांनी सुनावले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन विचारविनिमय करून तोडगा काढा, तो पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना सादर करावा. त्यांना भेटण्यासाठी संयुक्त शिष्टमंडळ तयार करावे व या शिष्टमंडळाने मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर दोन्ही बाजूच्या व्यथा मांडाव्यात. अशा मार्गाने थकबाकीचा मार्ग निघू शकतो. संबंधित गावांचा पाणीपुरवठा तोडणे हा त्यावर उपाय नाही, असेही शिवसैनिकांनी स्पष्ट केले. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता जे. डी. काटकर व शाखा अभियंता लोकरे यांना देण्यात आले.

उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना विस्तारक हर्षल सुर्वे, विनोद खोत, सरदार तिप्पे, अरुण अब्दागिरी, भगवान कदम, दीपक पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख पूजा शिंदे आदी शिवसैनिकांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.