पंढरपूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या सावटाखाली पंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा साधेपणाने आज (गुरूवार) पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे,  सारिका भरणे, मानाचे वारकरी कवडुजी भोयर,  कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा  साधना भोसले, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.

करोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.

अजित पवार म्हणाले की, राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी  आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिल्याबद्दल समस्त वारकरी बांधवांचे आभार मानले. विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच, अशी माझीही श्रद्धा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपण सर्वांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमांचे  काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पवारांनी यावेळी केले.