दिंडनेर्लीजवळ बिबट्याचे कातडे जप्त : दोघांना अटक

0
1503

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गारगोटी रोडवरील दिंडनेर्ली फाट्यावर आज (शुक्रवार) बेकायदेशीर बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आलेल्या दोघांना सापळा लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलं. बाजीराव श्रीपती यादव (वय ३९, रा. सोनुर्ले, ता. भुदरगड) आणि ब्रह्मदेव शशिकांत पाटील (वय ३२, रा. किटवडे, ता. आजरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून सहा लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले असून त्यांना मुद्देमालसहित इस्पुर्ली पोलीसांच्या ताब्यात देण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.अ.संभाजी भोसले, राजीव शिंदे, खंडेराव कोळी, बालाजी पाटील यांनी केली.