शिंगणापूर (प्रतिनिधी) : वाकरे येथे बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन झाले आहे. यामुळे शेतकरी आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली असता, परिसरातील सर्वांनी सावधगिरी बाळगावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

वाकरे येथे शेतकरी तानाजी शंकर पाटील जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. सरवळ, तांबूळ, कुरण या परिसरात ऊसामध्ये बिबट्या सदृश प्राणी आणि त्याचे एक पिल्लू दिसून पाहण्यात आले. शेतकऱ्याने त्वरित ही माहिती ग्रामपंचायतमध्ये कळवली. ग्रामपंचायतीच्या वतीने, कोतवाल बाजीराव कांबळे यांनी वन खात्याशी संपर्क साधला. यानंतर वनपाल व्ही. ई. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक कोमल रहाटे, दोन रेस्क्यू तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी तोडकर, अनिकेत पाटील, यांनी घटनास्थळी पाहणी केली व प्राण्यांच्या पायाचे ठसे घेतले.

लोकांनी शेती कामासाठी जाताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन सरपंच वसंत तोडकर यांनी केले आहे.