पार्ले धनगरवाडा येथे बिबट्याचा जनावरांवर हल्ला

0
88

कोल्हापूर : पार्ले धनगरवाडा (ता. चंदगड) येथे मालकी हद्दीत चरणाऱ्या रेडकावर व गायीवर बिबट्याने हल्ला केला. ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या जंगलात पळून गेला. बिबट्याच्या हल्ल्यात ही जनावरे जखमी झाली असून हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला.  

बिबट्याने मालकी हद्दीत चरणाऱ्या जनावरांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये धुळू बमू फोंडे यांचे दोन वर्षांचे रेडकू, तर पोलीस पाटील सखाराम फोंडे यांची गाय जखमी झाली. बिबट्याच्या हल्यामुळे बिथरलेली जनावरे पाहून फोंडे यांच्या आईने आरडाओरड केल्याने बिबट्या जंगलात पळून गेला. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी, वनरक्षक गणेश बोगरे, वनमजूर तुकाराम गुरव, चंद्रकांत बांदेकर, अर्जुन पाटील, विश्‍वनाथ नार्वेकर यांनी धनगरवाड्यावर जाऊन जखमी जनावरांची पाहणी केली.

वनानजीकच्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले. दरम्यान, गेल्या आठवड्यात बांद्राई धनगरवाड्यावर बिबट्याच्या हल्यात म्हैस जखमी झाली आहे. वाळलेले गवत आणि कठीण जमीन यामुळे त्याच्या पायाचे ठसे आढळले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.