मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव  यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार संजय केणेकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रज्ञा सातव यांचा बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

आ.शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची निवड बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती.  त्यानंतर  भाजप आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान,  काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर  रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होता. या निवडणुकीत भाजपने उमेदवार  उभा करू नये, अशी विनंती काँग्रेसचे  बाळासाहेब थोरात आणि  नाना पटोले यांनी  फडणवीस  यांच्याकडे केली होती. त्यानंतर भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रजनी पाटील बिनविरोध निवडून आल्या होत्या.