मुंबई (प्रतिनिधी) : जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन गुगल आज (सोमवार) २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांकडून अनेक गोष्टींची माहिती शोधण्यासाठी गुगलचा वापर होतो. गुगलने आज बर्थडेचे स्पेशल डूडल केले आहे.

गुगलचे सुरुवातीचे नाव Backrub असे होते. ते बदलून गुगल असे ठेवले. या नावाचा इतिहास १९२० पर्यंत मागे जातो. अमेरिकेचे गणिततज्ज्ञ एडवर्ड कॅन्सर यांनी मिल्टन सिरोट्टा याला १०० शून्य असलेल्या संख्येसाठी नाव निवडण्यास मदत करण्यास सांगितले होते. त्यावेळी सिरोट्टाने googol  हे नाव सुचवले होते. कॅन्सर यांनी याच शब्दाचा वापर करण्याचे ठरवले. पुढे हा शब्द १९४० मध्ये शब्दकोशात समाविष्ट केला  होता. तसेच कॅन्सर यांनी लिहिलेल्या पुस्तकातही १०० शून्य असलेल्या नंबरसाठी googol  शब्दाचा वापर केला.

१९९८ मध्ये जेव्हा लॅरी पेज आणि सर्जी बिन यांनी कंपनी सुरु केली. तेव्हा दोघांनीही गुगल नाव हे निश्चित केले. दोघेही इंजिनिअर होते आणि त्यांना या शब्दाबद्दल माहिती होती. अर्थात दोघांनी Googol  हा शब्द जसाच्या तसा न घेता त्यात बदल करून Google  असे केले. यामागे त्यांचा उद्देश एकच होता की जगभरातील माहिती एकाच ठिकाणी देणे. यासाठी त्यांनी १०० शून्य दाखवणारं हे नाव सर्च इंजिनला देण्याचा निर्णय़ घेतला.