कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंत्री कसा असावा याचे उदाहरण म्हणजे हसन मुश्रीफ तर मंत्री कसा नसावा याचे उदाहरण म्हणजे आ. चंद्रकांत पाटील आहेत. आ. पाटील यांना त्यांचे जन्मगाव असलेल्या खानापूर (ता. भुदरगड) येथील ग्रामपंचायतसुद्धा जिंकता आलेली नाही. मग त्यांचा उदो उदो किती करता ? जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने असुरक्षित वाटू लागल्यामुळेच त्यांना पुणे जिल्ह्यातील कोथरुडला जावे लागले, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.   

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करणारे पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रवादीनेही आज (सोमवार) पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. पत्रकात म्हटले आहे की, जाणीवपूर्वक आमचे नेते शरद पवार यांची बदनामी केली तर ती यापुढे खपवून घेणार नाही. त्याला जशास तसेच प्रत्युत्तर देऊ. मुश्रीफ यांच्या प्रकृतीची चिंता भाजपवाल्यांनी करू नये. मुश्रीफ यांच्या जनसेवेचे आणि विशेषता वैद्यकीय सेवेचे कौतुक खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या सर्वोच्च सभागृहातही केले आहे.

मुश्रीफ आणि गोरगरीब जनतेची नाळ घट्ट जुळलेली आहे. सर्वसामान्य माणसांच्या समस्यांच्या निराकरणासाठी पत्र द्यायला सुद्धा याआधी मंत्री आठवडा -आठवडाभर घालवायचे. जनतेला सर्किट हाऊसवर अक्षरश: रेंगाळायला लावायचे, हेही जनतेला चांगलेच माहीत आहे. पालकमंत्री या नात्याने मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्याची परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली आहे. त्यामुळे तेथील लोकप्रतिनिधींसह जनताही त्यांच्यावर खूष आहे.

जिल्ह्यातून उमेदवारी करणे असुरक्षित वाटल्यामुळेच पाटील यांना पुण्याला सुरक्षित जागी जावे लागले. जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. जिल्हा परिषदेसह महापालिका व कोणत्याच महत्त्वाच्या संस्थेवर भाजपची सत्ता राहिलेली नाही. सांगली जिल्ह्यात सगळ्या सत्ता राष्ट्रवादी काढून घेत आहे, असाही टोला लगाविण्यात आला आहे.

या पत्रकावर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जि. प. सदस्य युवराज पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जि. प. सदस्य सतीश पाटील – गिजवणेकर या प्रमुखांच्या सह्या आहेत.